*प्रेयसीसाठी ५ लाखांची मागणी; अग्निवीर तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव!*
प्रेयसीसाठी ‘अग्निवीर’ तरुणाचा पुण्यात भयंकर कारनामा! स्वतःच्याच अपहरणाचा रचला बनाव
पुण्यात अग्निवीर भरतीच्या वैद्यकीय चाचणीसाठी आलेल्या एका १९ वर्षीय तरुणाने प्रेयसीला पैसे देण्यासाठी आणि स्वतःच्या खर्चासाठी चक्क स्वतःच्याच अपहरणाचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ओम प्रकाश गौरीशंकर, राहणार बांदा, उत्तर प्रदेश, असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ओम प्रकाशला प्रेयसीला देण्यासाठी सुमारे दीड लाख रुपये आणि स्वतःच्या खर्चासाठी पैसे हवे होते. त्यासाठी त्याने आपल्या मोठ्या भावाकडून **पाच लाख रुपये उकळण्याचा कट रचला.
आपले अपहरण झाले असून अपहरणकर्ते पाच लाख रुपयांची खंडणी मागत आहेत, असा बनाव त्याने केला. इतकंच नाही तर कुटुंबीयांचा विश्वास बसावा म्हणून रडतानाचा आणि घाबरल्याचा व्हिडिओ तयार करून भावाला पाठवला.
व्हिडिओ पाहून कुटुंबीयांनी उत्तर प्रदेश पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधला.
पुणे पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे खडकी येथील क्राउन प्लाझा लॉजिंगवर छापा टाकला. मात्र, तिथे कोणतेही अपहरणकर्ते नव्हते, तर खुद्द ओम प्रकाश आरामात बसलेला आढळला.
खडकी आणि बंडगार्डन पोलिसांच्या पथकाने अवघ्या काही तासांत या बनावट ‘किडनॅपिंग ड्रामा’चा पर्दाफाश** केला असून तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.





