प्रामाणिकपणाची मिसाल! कराड ट्रॅफिक पोलिसांनी हरवलेला मोबाईल शोधून केला महिलेच्या स्वाधीन
कराडच्या प्रीतिसंगम परिसरात हरवलेला मोबाईल शोधून तो संबंधित महिलेच्या ताब्यात देत कराड शहर वाहतूक शाखेतील दोन कर्मचाऱ्यांनी कर्तव्याबरोबरच माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
कराडच्या विद्यानगर परिसरात राहणाऱ्या सीमा धम्मदोष ढवळे, वय २२ वर्षे, या आपल्या पतीसोबत सायंकाळच्या सुमारास प्रीतिसंगम घाट परिसरात महादेवाच्या दर्शनासाठी आल्या होत्या.
दर्शन आटोपल्यानंतर परतण्याच्या तयारीत असताना त्यांना आपला रेडमी कंपनीचा मोबाईल फोन सोबत नसल्याचे लक्षात आले. मोबाईल नेमका कुठे पडला, याचा शोध घेण्यासाठी त्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र बराच वेळ शोध घेऊनही मोबाईल सापडला नाही.
मोबाईल हरवल्याने त्या चिंतेत असतानाच त्यांच्या मदतीला कराड शहर वाहतूक शाखेचे कर्तव्यदक्ष कर्मचारी आले.
प्रीतिसंगम परिसरात वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावत असलेल्या तृप्ती वीर आणि राहुल माळी यांना हा मोबाईल आढळून आला. त्यांनी मोबाईल सुरक्षित ठेवत तो योग्य व्यक्तीच्या ताब्यात देण्याची जबाबदारी पार पाडली.
अखेर सीमा ढवळे यांना त्यांचा हरवलेला मोबाईल परत मिळाला. मोबाईल हातात पडताच त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. त्यांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले.
कर्तव्याच्या गणवेशासोबत प्रामाणिकपणाची जाणीव जपणाऱ्या तृप्ती वीर आणि राहुल माळी यांच्या या कृतीचे कराडकरांकडून कौतुक होत आहे. पोलिसांच्या अशा छोट्या पण संवेदनशील कृतींमुळे ‘पोलीस आपल्या सेवेसाठी’ हा विश्वास आणखी दृढ होत आहे.





