पुण्यात राष्ट्रीय खो-खो खेळाडूची आत्महत्या; POCSO गुन्ह्यात होता फरार, अटकेच्या भीतीने टोकाचं पाऊल?
पुण्यात राष्ट्रीय पातळीवरील खो-खो खेळाडूने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडचा रहिवासी आणि दोन वेळा महाराष्ट्राच्या राष्ट्रीय खो-खो संघाचे प्रतिनिधित्व केलेला तुकाराम करांडे याने पुण्यात गळफास घेऊन जीवन संपवलं.
तुकारामविरोधात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून पॉक्सो कायद्यान्वये बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो बीडमधून फरार होऊन पुण्यात आला होता.
यापूर्वी सुमारे १५ दिवसांपूर्वी अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी बीड पोलिसांनी त्याला अटक केली होती. या प्रकरणात जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्यावर पॉक्सोचा गंभीर गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणात तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. १८ ऑगस्टची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, २१ ऑगस्टला सुनावणी होणार होती.
अटकेची भीती आणि जामीन मिळण्याबाबतच्या तणावातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही.
पुणे आणि बीड पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





