शहापूर आश्रमशाळेत २१ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग? आरोपीला अटक
महाराष्ट्र हादरला! २१ अल्पवयीन विद्यार्थिनींच्या विनयभंगाचा आरोप; आश्रमशाळेत खळबळ
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एका शासकीय आदिवासी आश्रमशाळेत २१ अल्पवयीन विद्यार्थिनींच्या विनयभंगाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी आश्रमशाळेतील स्वयंपाक्याचा मदतनीस म्हणून काम करणाऱ्या गणपत गवळी गणपत झिपरू याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, टेंभा गावातील या आश्रमशाळेच्या इमारतीत मुलं आणि मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहांची व्यवस्था आहे. विद्यार्थिनी कपडे धुण्यासाठी आणि जेवणासाठी ये-जा करत असताना आरोपी त्यांना त्रास देत असल्याचा आरोप आहे.
धक्कादायक म्हणजे, दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला आरोपीने एकटी गाठून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पीडित विद्यार्थिनीने ही घटना आश्रमशाळेच्या अधीक्षकांना सांगितल्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आलं.
यानंतर अधीक्षक आणि पीडित विद्यार्थिनींनी शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
या घटनेनंतर आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





