मालाडमध्ये धक्कादायक हत्याकांड! पत्नीची चाकूने हत्या, मृत्यू होताच पती रुग्णालयातून फरार
मुंबईत संसाराचा भयंकर शेवट! मध्यरात्री बेडरूममध्ये पतीने पत्नीच्या छातीवर चाकूने वार केला आणि त्यानंतर जे घडलं ते हादरवून टाकणारं आहे!
मालाड पूर्वेतील कुरार गाव परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली.
सुचिता आकाश साळुंखे, वय २९, असं मृत महिलेचं नाव आहे. सुचिता या पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करत होत्या.
सुचिता आणि आकाश यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना चार वर्षांचं एक बाळही आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आकाश बेरोजगार असून तो मद्य आणि अमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. मध्यरात्री दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आकाशने सुचिताच्या छातीवर चाकूने वार केल्याचा आरोप आहे.
जखमी सुचिताला आकाशने मित्रांच्या मदतीने कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.
पत्नीचा मृत्यू झाल्याचं समजताच आकाश रुग्णालयातून फरार झाला.
कुरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत.
या हत्येमागचं नेमकं कारण काय? दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला? याचा तपास आता पोलीस करत आहेत.





