आकाशपाळण्याच्या परवानगीसाठी लाच; पोलीस अधिकाऱ्यावरही गुन्हा

Rokhthok Maharashtra 7 0

साताऱ्यात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आकाशपाळणा उभारण्यासाठी ना-हरकत परवानगी देण्याच्या बदल्यात ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदाराला एसीबीने रंगेहाथ पकडलं आहे.

दीपक लक्ष्मण पोळ, असे कारवाई करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. ते सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने आकाशपाळणा उभारण्यासाठी ना-हरकत परवानगी मागितली होती. ही परवानगी देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी सातारा शहरातील राजवाडा परिसरातील एका औषध दुकानाजवळ दीपक पोळ यांना ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलं.

दरम्यान, या प्रकरणात लाचेची मागणी करण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप असलेले शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम रोवाळे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईनंतर सातारा पोलीस दलात खळबळ उडाली असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.