इन्स्टा कमेंट-लाईकवरून वाद; रील स्टारवर कोयत्याने हल्ला!

Rokhthok Maharashtra 12 0

पुण्यातील डेक्कन परिसरात दोन रील स्टारमधील सोशल मीडिया कमेंट आणि लाईकवरून सुरू झालेला वाद गंभीर वळणावर गेला. रील स्टार अथर्व प्रमोद जगताप याच्यावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी पहाटे डेक्कन जिमखाना परिसरातील शिरोळे रोडवरील कॅफे फ्लाईंग जिप्सी येथे घडली.
या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून दोन तरुणींसह सात जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये *माधवी राजेश कुंभार, स्नेहल संजय सोनके, राहुल सीताराम वाघमारे, शिवानंद ऊर्फ शिवराज तलवार, आदित्य सुनील भालेराव, प्रियांशु ऊर्फ पियुष प्रदीप भोसले आणि प्रेम मनोज साळवे* यांचा समावेश आहे. तसेच एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेत *अथर्व प्रमोद जगताप*, वय १९, हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्याची फिर्याद नोंदवली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अथर्व जगताप हा रील स्टार असून त्याचे तब्बल अडीच लाख फॉलोवर्स आहेत. तो महागड्या गाड्यांवर स्टंटचे व्हिडिओ बनवतो. काही दिवसांपूर्वी तो सातारा जिल्ह्यातील कास पठार येथे गेला असताना गाडीला कट मारल्याच्या कारणावरून वाद झाला होता. याच वादातून पुढे सोशल मीडियावरील कमेंट आणि लाईकवरूनही वाद वाढल्याची माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्टच्या पहाटे सव्वा तीन ते पावणेचारच्या दरम्यान कॅफे फ्लाईंग जिप्सी येथे अथर्ववर हल्ला झाल्याचा आरोप आहे. डेक्कन पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.