ओबीसी आरक्षणाचा लाभ झालेल्या राजकीय कार्यकर्त्यांनी आरक्षणासाठी उठाव करण्याची गरज – बाळासाहेब शिवरकर

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे – ओबीसी आरक्षणाचा विषय सध्या विविध राजकीय पक्षांनी हाती घेतलेला दिसतो आहे. यात ओबीसीं

विषयी कळकळ कमी आणि राजकारणच जास्त दिसते आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणामधून ज्या कार्यकर्त्यांना लाभ झाला आहे त्यांनी, संघटितपणे या आरक्षणासाठी उठाव करण्याची गरज आहे असे आवाहन माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केले आहे.

यासंबंधात जारी केलेल्या निवेदनात शिवरकर यांनी म्हटले आहे की ओबीसी आरक्षणामुळे अनेकांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. अनेक जण सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर झाले. ही सर्व मंडळी सध्या या आरक्षणाच्या विषयावर शांत दिसत आहेत. याचाच गैरफायदा घेऊन काही राजकीय पक्षांनी ओबीसींची सहानुभूती मिळवण्यासाठी आणि मतासाठी त्याचा लाभ करून घेण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात या राजकीय पक्षांची ओबीसी विषयीची कळकळ केवळ वरवरची आहे. त्यांना या विषयात मूलभूत आस्था दिसत नाही. केवळ एकमेकांवर राजकीय कुरघोड्यांसाठी त्यांनी हा विषय हाती घेतलेला दिसतो. ही बाब लक्षात घेतली तर ज्या आरक्षणामुळे आपल्या समाज बांधवांना खऱ्या अर्थाने राजकीय लाभ झालेला आहे त्यांनी व्यापक चळवळ हाती घेण्याची गरज आहे. अशा व्यक्तींची एकत्रित मोट बांधून आंदोलनाचे हत्यार आपण उगारले तर त्याचा चांगला उपयोग होईल असे वाटते. त्यामुळे संबंधित राजकीय कार्यकर्त्यांनी या प्रस्तावाचा विचार करून आपापल्या भागातील ओबीसी राजकीय कार्यकर्त्यांचे संघटन करून बैठका हाती घ्याव्यात. आणि एक व्यापक चळवळ उभारावी असे आवाहन ही शिवरकर यांनी केले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.