खातेवाटपानंतर शिंदे गटातील दादा भुसे नाराज? नॉट रिचेबल झाल्याची चर्चा खातेवाटप मध्ये मनासारखी खाती न मिळाल्याने मुख्यमंत्री शिंदे गटासह भाजप नेत्यांमध्ये नाराजीचा सूर
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्ताराला तब्बल ४० दिवसानंतर मुहूर्त मिळाला. त्यानुसार ९ ऑगस्टला राजभवनात १८ मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर सर्वांचेच लक्ष मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाकडे लागले होते. अखेर पाच दिवसानंतर शिंदे सरकारने खातेवाटप जाहीर केलं आहे. खातेवाटपात अनेक धक्कादायक बदल असतील, असे संकेत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच दिले होते. अखेर त्यानुसार खातेवाटपात काही अनपेक्षित बदल झाल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तार बाकी असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे १३ खाती ठेवली आहेत. तसंच त्यांच्याकडे इतर कोणत्याही मंत्र्याला न वाटप केलेल्या खात्याचाही कारभार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आला आहे. शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ ही खाती असणार आहेत.





