वडापाव, भजी वर्तमानपत्रात खाता? तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर मोठा इशारा!

Rokhthok Maharashtra 2 0

मुंबईतील एका प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केल्यानंतर वर्तमानपत्रात गुंडाळून दिल्या जाणाऱ्या वडापाव, भजी, समोसे आणि इतर खाद्यपदार्थांबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईनंतर राज्यभरातील अन्न विक्रेत्यांना कडक इशारा देण्यात आला आहे.
तज्ज्ञांच्या मते, वर्तमानपत्राच्या छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये शिसे, क्रोमियम, कॅडमियम यांसारखे घातक धातू आणि रसायने असतात. गरम, तेलकट किंवा ओलसर अन्न वर्तमानपत्राच्या संपर्कात आल्यानंतर ही रसायने थेट अन्नात मिसळू शकतात.
नवी दिल्लीतील सूक्ष्मजीवशास्त्र तज्ज्ञ डॉ. दिशा भाटिया यांच्या मते, अशा दूषित अन्नाचे सातत्याने सेवन केल्यास मज्जासंस्था, मूत्रपिंड आणि मेंदूच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. तसेच कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोकाही वाढू शकतो.
याशिवाय वर्तमानपत्रे अनेक हातातून फिरत असल्याने त्यावर धूळ, प्रदूषण, जीवाणू आणि इतर सूक्ष्मजीव असण्याची शक्यता असते. त्यामुळे संसर्गाचा धोकाही वाढतो.
तज्ज्ञांनी विक्रेत्यांना फूड-ग्रेड बटर पेपर, केळीची पाने, पत्रावळी किंवा अन्नसुरक्षा मान्यताप्राप्त पॅकेजिंग साहित्य वापरण्याचा सल्ला दिला आहे.
म्हणून पुढच्या वेळी वडापाव, भजी किंवा समोसे घेताना ते कोणत्या कागदात दिले जात आहेत याकडे नक्की लक्ष द्या. कारण चवदार खाद्यपदार्थांसोबत नकळत आरोग्याला धोका तर मिळत नाही ना, हे तपासणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.