“५० वेळा फोन केले पण…” आंबेनळी घाट दुर्घटनेत वडिलांचा हृदयद्रावक खुलासा

Rokhthok Maharashtra 2 0

रायगडच्या आंबेनळी घाटात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
स्कॉर्पिओ गाडी तब्बल हजार फूट खोल दरीत कोसळल्याने आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेत साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव गावातील पाच तरुणांचा जीव गेला असून गावावर अक्षरशः शोककळा पसरली आहे.
हर्णे येथे पिकनिक आटोपून हे सर्वजण आपल्या घरी परतत होते.
मात्र आंबेनळी घाटात काळाने त्यांच्यावर घाला घातला.
या अपघातानंतर सर्वात हृदयद्रावक घटनाक्रम समोर आला तो मृत तरुण रितेश लोखंडे यांच्या वडिलांनी सांगितलेला…
त्यांनी सांगितलं…
“सकाळपासूनच मनात धाकधूक होती… काहीच सुचत नव्हतं… मी दिवसभरात ५० ते ६० वेळा मुलांना फोन केला… फोनची रिंग वाजत होती, पण कोणीच उचलत नव्हतं…”
वेळ जसजसा पुढे जात होता तसतशी कुटुंबाची चिंता वाढत गेली.
संध्याकाळ झाली… रात्र झाली… पण मुलांचा काहीच संपर्क होत नव्हता.
अखेर कुटुंबीयांनी नातेवाईकांना फोन केले.
रात्रभर शोधाशोध आणि फोनाफोनी सुरू होती.
रात्री १ ते २ वाजेपर्यंत सर्वजण मुलांचा शोध घेत होते.
रितेशचे वडील स्वतः हॉस्पिटलमध्ये काम करतात.
त्यांनी डॉक्टर थोरात यांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला.
यानंतर प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी शोधमोहीम सुरू केली आणि समोर आली ती काळजाचा थरकाप उडवणारी बातमी…
स्कॉर्पिओ गाडी दरीत कोसळली होती.
या अपघातानंतर ग्रामस्थांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.
घाटात पुरेसे संरक्षक कठडे आणि भिंती नसल्याने हा अपघात अधिक भीषण ठरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
“संरक्षक भिंत असती तर आमची मुलं आज जिवंत असती…”
असं म्हणत गावकऱ्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
या अपघातात महेश पवार, आदित्य साळुंखे, रितेश लोखंडे, सुहास लोखंडे, अंश चव्हाण, उत्कर्ष शिंगटे, अनिल शिंगटे आणि नितीन नायकोंडे यांचा मृत्यू झाला आहे.
आता तरी प्रशासनाने आंबेनळी घाटात ठोस सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.