अमोल नाना तुपेंच्या प्रयत्नांना यश! शिंगोटे पार्कचा अनेक वर्षांपासूनचा वीजप्रश्न अखेर सुटला

Rokhthok Maharashtra 1 0

मांजरी परिसरातील शिंगोटे पार्क सोसायटीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गंभीर वीज समस्येला अखेर दिलासा मिळाला आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या शेकडो नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला असून, हा प्रश्न क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष अमोल नाना तुपे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे.
शिंगोटे पार्क परिसरातील सुमारे ७०० ते ८०० कुटुंबे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून वीजेच्या समस्येचा सामना करत होती. मागील सहा महिन्यांत परिस्थिती अधिक गंभीर झाली होती. एकदा वीज गेली की तब्बल १२ ते १५ तास पुरवठा सुरळीत होत नव्हता. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, ज्येष्ठ नागरिक व महिलांचे हाल आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.
या समस्येबाबत नागरिकांनी अनेकदा महावितरण आणि प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती. अखेर परिसरातील नागरिकांनी एकत्र येत अमोल नाना तुपे यांच्याकडे धाव घेतली.
तुपे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधला. त्यांनी नागरिकांची बाजू आक्रमकपणे मांडत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यानंतर महावितरणने या प्रश्नाची गंभीर दखल घेत तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे आणि नवीन अधिक क्षमतेचे रोहित्र बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
“विद्यार्थ्यांचे भविष्य आणि नागरिकांचे आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. नागरिकांना अंधारातून बाहेर काढण्यासाठी आम्ही सातत्याने लढत राहू,” अशी प्रतिक्रिया अमोल नाना तुपे यांनी दिली.
अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने शिंगोटे पार्कमधील रहिवाशांनी अमोल नाना तुपे आणि क्रांती शेतकरी संघटनेचे जाहीर आभार मानले आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.