जळीतकांड: 12 दिवस उलटले, पण पीडित अजूनही उघड्यावर! प्रशासन कुठे?

Rokhthok Maharashtra 2 0

पुण्यातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘शासन आपल्या दारी’च्या घोषणा हवेत विरल्यात की काय? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण, हडपसरमधील त्या भीषण जळीत घटनेला आज १२ दिवस उलटले आहेत, पण पीडित कुटुंबं आजही उघड्यावर आहेत!
हडपसरच्या शंकर मठाजवळ राहणाऱ्या वडार समाजाच्या २० कुटुंबांचा संसार ६ मार्चला आगीत खाक झाला. मुलांची पुस्तकं जळाली, घराचं छप्पर गेलं आणि पोटाची भाकरही करपली! पण दुर्दैव असं की, १२ दिवस झाले तरी प्रशासनाचा एकही अधिकारी या गरिबांच्या अश्रूंची पुसणी करायला पोहोचलेला नाही.
या अन्यायाविरुद्ध आज वडार एकता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत विटकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन पुकारण्यात आलंय. “आम्हाला आश्वासनं नकोत, पुनर्वसन हवंय!” अशा घोषणांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला आहे.

 

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या काय आहेत, त्यावर एक नजर टाकूया:

विस्थापित कुटुंबांचं तातडीने कायमस्वरूपी पुनर्वसन करा.

मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य आणि कपडे त्वरित उपलब्ध करून द्या.

जळालेली कागदपत्रं पुन्हा मिळवण्यासाठी विशेष प्रशासकीय कॅम्प लावा.

मुख्यमंत्री एकीकडे भटक्या-विमुक्तांना जमिनीचे पट्टे देण्याची भाषा करतात, तर दुसरीकडे त्यांचेच अधिकारी या जळीतग्रस्तांकडे दुर्लक्ष करतात. आता प्रश्न हा आहे की, या कुटुंबांना न्याय मिळणार की हे आंदोलन आणखी उग्र रूप धारण करणार?

आम्ही या बातमीवर सातत्याने लक्ष ठेवून आहोत. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा, ‘रोखठोक महाराष्ट्र न्यूज’.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.