राहुल शेवाळे यांच्या आंबा महोत्सवाला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट |

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे जिल्ह्यातील शेवाळेवाडी परिसरात युवा उद्योजक शेतकरी राहुल शेवाळे यांच्या शेवाळे ॲग्रो फार्म मधील शिवसमर्थ देवगड हापूस आंबा महोत्सवाला राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देत आंब्याची चव घेत कौतुक केले.
या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे कोकणातील देवगड भागातील आंब्यांची बाग आधुनिक एआय टेक्नॉलॉजीच्या मदतीने नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने विकसित करण्यात आली आहे. या बागेतील आंबे थेट ग्राहकांसाठी महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
महोत्सवादरम्यान कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आंब्याची चव घेतली आणि या उपक्रमाचे विशेष कौतुक करत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत प्रगती साधावी, असे आवाहन केले.
यावेळी आयोजक राहुल शेवाळे यांच्यासह सिद्धार्थ शेवाळे, सार्थक शेवाळे, विलास शेवाळे, संभाजी हाके, संजय कोद्रे, विजय कोद्रे, सुनील शेवाळे, अतुल शेवाळे, मंगेश शेवाळे, चंद्रकांत शेवाळे, हभप रामदादा शेवाळे आणि माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, बाजारात कोकणातील आंब्याच्या नावाखाली इतर भागातील, विशेषतः बेंगलोर , कर्नाटक परिसरातील केमिकलद्वारे पिकवलेले आंबे मोठ्या प्रमाणावर विकले जात असल्याने ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी दिली. याला पर्याय म्हणून त्यांनी आंब्याला जीआय टॅगिंग केले असून त्यामुळे ग्राहकाला देवगड आंबा सहज ओळखता येतो , तसेच नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला अस्सल देवगड आंबा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
एआय टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे आंब्याच्या उत्पादनाची गुणवत्ता आणि देखभाल अधिक प्रभावीपणे केली जाते, त्यामुळे ग्राहकांना खऱ्या आंब्याची चव अनुभवता येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या आंबा महोत्सवाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, ग्राहकांनी आंब्याच्या चवीचे भरभरून कौतुक केले आहे.
“या महोत्सवाला भेट द्या आणि सुमधुर आंब्याचा स्वाद घ्या,” असे आवाहन राहुल शेवाळे यांनी नागरिकांना केले आहे. हा सेंद्रिय व अस्सल देवगड हापूस आंबा देशातील अनेक राज्यात ऑनलाइन पद्धतीने पाठविला जातो असेही शेवाळे यांनी सांगितले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.