पुणे

विचलीत न होता काँग्रेस कार्यकर्ते नेटाने लढतील – माजी आमदार मोहन जोशी

पुणे : निवडणुकांच्या काळात घडणाऱ्या कोणत्याही घडामोडींमुळे विचलीत न होता काँग्रेसचे कार्यकर्ते नेटाने महापालिका निवडणुकांना सामोरे जातील, असा विश्वास माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केला.

महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी शहरातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि बैठका घेण्यास मोहन जोशी यांनी प्रारंभ केला आहे. निवडणुका जवळ आल्या की अनेक घडामोडी घडतात, काही जण संधीसाधूपणाने भूमिका बदलत असतात पण यातून अजिबात विचलीत न होता काँग्रेस कार्यकर्ते नेटाने निवडणूक लढवतील. काँग्रेस पक्षाची विचारधारा मानणारा मोठा वर्ग पुण्यात आहे. विविध जातीधर्माना एकत्र घेऊन सलोख्याने वागणाऱ्या काँग्रेस पक्षाचे महत्त्व पुणेकरांना पटले आहे. मोदी सरकारच्या भूलथापा आणि पोकळ आश्वासनांना जनता कंटाळली आहे.कॉंग्रेस पक्ष हाच योग्य पर्याय असल्याचे लोकांना कळून चुकले आहे, असे मोहन जोशी यांनी बैठकांमधून सांगितले.

महापालिका निवडणूक वॉर्ड पद्धतीने होवो अथवा द्विसदस्यीय प्रभाग पध्दतीने होवो कॉंग्रेस पक्षाची सामोरे जाण्याची जय्यत तयारी आहे, असेही मोहन जोशी यांनी स्पष्ट केले. नेहरु योजना, हरित पुणे योजना अशा कामांतून पुण्याच्या विकासात काँग्रेसच्या योगदानाची पुणेकरांची जाणीव असल्याचे जोशी म्हणाले.