पुणे

‘वीआ मिसेस इंडिया २०२१’ स्पर्धेत सुजाता रणसिंग ठरल्या क्लासिक कॅटेगरीत विजेत्या 

पुणे : ‘वीआ मिसेस इंडिया २०२१’मध्ये पुण्याच्या खराडी येथील सुजाता दत्तात्रय रणसिंग या क्लासिक कॅटेगरीत विजेत्या  ठरल्या आहेत. वीआ एंटरटेनमेंटद्वारे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धा ‘वीआ मिस आणि मिसेस इंडिया २०२१’चा ग्रँड फिनाले जयपूर येथे नुकताच थाटात पार पडला. वेस्टर्न, ट्रेडिशनल, इंडो वेस्टर्न आणि स्पार्कल डिझायनर आउटफिट्सच्या थीमवर एकूण तीन फेऱ्यांमध्ये पूर्ण झालेल्या फॅशन सिक्वन्समध्ये, अंतिम फेरीसाठी निवडलेल्या टॉप फायनलिस्ट मॉडेल्सने टायटल क्रावऊनसाठी कॅट वॉक केले.

आयोजक हरीश सोनी आणि व्यवस्थापन प्रमुख ममता गर्ग यांनी सांगितले की ही भारताची सर्वात मोठी आणि सर्वोत्तम सौंदर्य स्पर्धा आहे. या स्पर्धेत नागपूर, पुणे, दिल्ली, नाशिक, बंगळुरू यासारख्या इतर शहरांतील मॉडेल सहभागी झाले होते. ते पुढे म्हणाले की या ग्रँड फिनाले कार्यक्रमात रचना, शोभा गुप्ता आणि सिद्धी गुप्ता या डिझायनर्सनी त्यांच्या कपड्यांचे संग्रह प्रदर्शित केले. मॉडेलचे सुंदर मेकओव्हर यशल पंडेल आणि हॅशटॅग ब्लंटच्या मनीषा पंडेल यांनी केले. या स्पर्धेचे अधिकृत छायाचित्रकार सोनू जांगिड, नृत्यदिग्दर्शक पूजा सिंह आहेत. अंजना मास्करेन्हास व कार्लस मास्करेन्हास, डॉ.प्रचिती पुंडे, मंदाकिनी पाटील, डॉ.वनिषा चोप्रा या स्पर्धेच्या न्यायपंच पॅनलमध्ये उपस्थित होते. मनोज शर्मा हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या स्पर्धांमधील अनुभवा बद्दल बोलताना सुजाता दत्तात्रय रणसिंग म्हणाल्या, ‘या दोन्ही स्पर्धांमधील माझा प्रवास हा खूप सुंदर होता. माझं खूप चांगल ग्रूमिंग झालं. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. नवीन लोकं  भेटली. वैचारीक आदानप्रदान झाली. एक वेगळाच आत्मविश्वास या प्रवासात मला मिळाला. आमची ट्रस्ट आहे. त्यामार्फत आम्ही अनेक सामाजिक आणि शैक्षणिक कार्या करीत असतो. कोरोनामध्ये आम्ही अनेक लोकांना मदतही  केली आहे. केवळ आवड म्हणून मी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. मागील वर्षी मिसेस महाराष्ट्रमध्ये मी भाग घेतला होता. त्यात मला  ‘मिसेस अचीव्हर्स अवॉर्ड’ने संन्मानीत करण्यात आले. त्यानंतर मी ‘वीआ मिसेस इंडिया २०२१’मध्ये भाग घेतला. मॉडलिंग किंवा ग्लॅमरस असे माझे कार्यक्षेत्र नाही. पण संधी मिळाली तर मी नक्कीच यामध्ये करीयर करण्याचा विचार करीन. आगामी काळात ‘मिसेस वर्ल्ड’ स्पर्धेत भाग घेण्याचा मानस आहे.’