पुणे

“खिडकीत ठेवलेल्या चावीने घर उघडून ४ लाख ४० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला”

हवेली प्रतिनिधी :-

अमन शेख। लोणी काळभोर : अज्ञात चोरट्यांनी दरवाज्याचे बाजुला असलेल्या खिडकीत ठेवलेल्या चावीने घर उघडून आत प्रवेश करून १६ तोळे सोन्याचे दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ४ लाख ४० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला असल्याची घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. 

                याप्रकरणी पांडुरंग रामचंद्र मराठे ( वय ५२, रा. अष्टापूरेमळा, बापदेव – पांडवदंड रोड, कदमवाकवस्ती, ता. हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना शनिवार ( १३ नोव्हेंबर ) रोजी सायंकाळी ४ ते ७ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. मराठे यांची पत्नी रेणूका ही ब्युटी पार्लर चालवित असून ती सकाळी ११ वाजता दुकानावर जाते व सायंकाळी ७ वाजता घरी परत येते. तिला नेणे आणणेकरीता ते स्वतः जात असतात.

           १३ नोव्हेंबर रोजी ते सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारांस ते नेहमीप्रमाणे घरांस बाहेरून कूलूप लावून त्याची चावी बाजूचे खिडकीमध्ये ठेवून पत्नीस आणणेकरीता तनिष्का ब्युटी पार्लर, समृद्धी पॅलेस, अंबिका माता रोड, लोणी स्टेशन येथे  दुचाकीवरून गेले होते. ७ वाजणेचे सुमारांस दोघे घरी आले. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडताना  ठेवलेल्या चावीची जागा बदललेली दिसून आली. त्यावेळी दरवाजा उघडून ते आत गेले असता त्यांना  दोन्ही बेडरूममधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यावेळी त्यांनी संपुर्ण घराची पाहणी केली असता बेडरूममधील कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेले पत्नी व सुनेचे १६ तोळे व २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी मुलाचे बेडरूममधील कपाटातील सामानाची पाहणी केली असता त्याने लॉकरमध्ये ठेवलेली रोख रक्कम ३५ हजार रुपये नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी घरामध्ये शोधाशोध केली असता ते कोठेही मिळून आले नाही. 

              चोरी झालेची खात्री पटलेनंतर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सहा तोळे वजनाचा गळयातील गंठण, १ लाख ५० हजार रुपये किमतीचा सहा तोळे वजनाचा राणीहार, ७५ हजार रुपये किमतीचा तीन तोळे वजनाचा नेकलेस, ५ हजार रुपये किमतीची दोन ग्रॅम वजनाची नाकातील नथ, १२ हजार ५०० रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, १२ हजार ५०० रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व ३५ हजार रुपये रोख रक्कम भारतीय चलनी नोटा असा एकूण ४ लाख ४० हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला असल्याची फिर्याद दिली आहे.