पुणे

“पुण्यात वाढतेय युवकांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण, – समाजाला दोष देताना पालकांची जबाबदारी काय?..

पुणे शहराचा सर्व बाजूने विस्तार होत गेला. आयटी सेक्टरमुळे उपनगरही विस्तारली गेली. विविध ठिकाणावरून नोकरी निमित्ताने नागरिकांचा ओघ वाढत गेला. गरजेनुसार मोठमोठ्या उंच ईमारती, मोठमोठी गृह संकुले(अर्थात टाऊन शिप)उभारले गेली.

सुसंस्कृत पुणे शहराने सर्वांना स्विकारले. आधुनिक काळाचा विचार करता गरजेनुसार एकत्र कुटुंब पध्दतीचा हळूहळू लय होत गेला अन् विभक्त कुटुंब पध्दती वाढीस लागली !घरात हमदो आणि हमारे दो बरोबरच आता हम दो व हमारा एक या जीवनशैलीचा उदय झाला तसा तो पुढे वाढतच आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

पूर्वी एकत्र कुटुंब पध्दत होती, त्यामुळे घरात वर्दळ असायची. एकलपणा नव्हता. जे काही केले जात ते सामुदायिक पध्दतीने केले जायचे. दिवसभर जरी घरातील मंडळी एकमेकांना भेटली नाही तरी संध्याकाळी मात्र एकत्र भोजन घेत असत त्यामुळे दिवसभराच्या घडामोडींचा विचार केला जात असे. एकमेकांच्या अडचणी, समस्या समजून घेतल्या जात व त्या सोडवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत. घरात मोबाईल, टिव्हीचा वापर कमी आणि आपापसात संभाषण होते त्यामुळे एकटे पणाला थारा नव्हता.

नोकरी, धंद्याच्या निमित्ताने घरातील कर्ती मंडळींना(आई/वडील) दिवसभर बाहेर रहावे लागते. यामुळे कळतनकळत घरातील लहान मुलांच्याकडे थोडे फार दुर्लक्ष होत आहे. त्यांना रिझवण्यासाठी टीव्ही, मोबाईलच खेळणे आपसूकच त्यांच्या हाती देण्यात येत आहेत. घरात एकलकोंडामुळे याचा वापर वाढत जातो या माध्यमातून नको ते मुले पहातात याचे दुष्परिणाम मुलांच्या मनावर होतात. टीव्ही सिरीयल मधील काही दृश्य, मोबाईल मधील स्वैराचार याचा बाल मनावर विपरीत परिणाम होत आहेत.

एकटेपणा, स्वैराचार व संगत यामुळे दहशतवाद फार वाढत आहे. गुंडप्रवृत्ती मध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे. कारण पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात आता विविध गैरप्रकार, गुंडगिरीला यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. या गुंडगिरी, अत्याचारात बहुतांश तरुण पिढी दिसून येत आहे. हे समाजाच्या दृष्टीने घातक आहे. आता तर बालगुन्हेगार, तसेच ऐन तारुण्यात पदार्पण करणारी पिढी गुंड प्रवृत्तीकडे दिसून येत आहे. पुणे शहरात आता तर या कोयतागॅंगने मोठी दहशत निर्माण केली आहे. सर्व सामान्य नागरिकांमध्ये मात्र यामुळे घबराट निर्माण होते आहे.

कोयतागॅंगला अटकाव करण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. यातील दोन पोलिसांनी तर जीवावर उदार होवून त्यातील काही जणांना जेरबंद केले आहे. पुणे पोलिसांनी तर आता कोयता विकत घेणाऱ्यांच्या नोंदी ठेवण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे. हा एक चांगला निर्णय घेतला आहे असे म्हणायला हरकत नाही.

प्रशासन त्यांचे काम करतीलच परंतु त्याअगोदर पालक म्हणून आपली सुध्दा काही जबाबदारी आहे. आपण ज्यावेळी नोकरी/ धंद्या निमित्ताने बाहेर जाणार त्यावेळी आपल्या पाल्याला एकाकीपणा जाणवणार नाही याची संपूर्ण काळजी घ्यायला हवी. आई/वडिलांनी घरी आल्यावर आपल्या पाल्यांना जास्तीत जास्त वेळ देऊन त्यांना समजून घेण्यासाठी प्रयत्न करायला हव्यात, त्यांच्या समस्या जाणून घ्यायला हव्यात व त्या सोडवायला हव्यात. त्याला/तिला ज्यात आनंद मिळेल त्यात समरस होण्याचा प्रयत्न करायला हवे. थोडक्यात कुटुंब वत्सल व्हायलाच हवं. आपणच आपल्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी घेऊन समाजात आदर्श निर्माण करायला हवा. शेवटी थेंबे थेंबे तळे साचे ! या ब्रीदवाक्यातून सुसंस्कृत समाज घडवून सुरक्षित व आनंदी जीवन जगू या !!

सुधीर मेथेकर