पुणे

उद्योजक बनणे ही काळाची गरज’ – गंधाली दिंडे

पुणे – रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची भारतरत्न भीमसेन जोशी कलामंदिर येथे नुकतीच “करियर मार्गदर्शन कार्यशाळा” संपन्न झाली. या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात प्रमुख पाहुण्या म्हणून  गंधाली दिंडे, विभागीय प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र शासन उद्योजक विकास केंद्र, कोल्हापूर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणाल्या की, “ सध्याचे युग हे तरुणांसाठी मोठे आव्हान उभे करणारे युग आहे. शिक्षण आणि नोकरी याची सांगड घालणे आज कठीण होत आहे. म्हणून आजच्या या युगाची परिभाषा समजून घेऊन युवकांनी उद्योजक बनणे ही काळाची गरज आहे. उद्योग व्यवसायाकडे वळणे आज महत्त्वाचे आहे. स्वतःच्या जीवनाला योग्य दिशा देऊन केवळ उदरनिर्वाहापुरते स्वतःला बंदिस्त न करता इतरांसाठी रोजगार निर्माण करण्यासाठी आपण तत्पर असायला हवे. आपल्या यशाच्या सर्वच वाटा आपल्याला उद्योजकतेतच सापडतात” असे मौलिक विचार त्यांनी यावेळी मांडले. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी मा. गंधाली दिंडे यांची यावेळी प्रदीर्घ मुलाखत घेतली. प्रश्नोत्तराच्या साह्याने “उद्योजक कसा असावा?” या प्रश्नाचे उत्तर यावेळी मा. गंधाली दिंडे यांनी दिले. 

 या सत्राचे अध्यक्ष पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर मा. दत्तात्रय गायकवाड हे होते.  यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ रमेश रणदिवे, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे कार्याध्यक्ष प्रा. भीमराव पाटील, डॉ. सविता पाटील, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रभंजन चव्हाण, विद्यार्थी प्रतिनिधी श्री. निलेश सुतार, कु. शुभांगी शिंदे इ. उपस्थित होते. 

या कार्यक्रमात प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय मा. बंडोपंत कांबळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. सायली गोसावी यांनी तर आभार डॉ. रमेश रणदिवे यांनी मानले. या कार्यशाळेला महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी व पालक बहुसंखेने उपस्थित होते.