पुणे

“हडपसर पोलिसांच्या सहकार्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाच व्यसनमुक्तीचा मोलाचा संदेश – हडपसर परिसरात जनजागृती बाईक रॅली”

सध्या पुणे शहरांमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये अटक झालेल्या आरोपींपैकी फार मोठ्या प्रमाणात आरोपी व्यसनाधीन झालेले दिसून येत आहेत. व्यसनांमुळे अनेक प्रकारचे गुन्हे घडत आहेत यामध्ये लहान मुले, विद्यार्थी गुटखा, तंबाखू, सिगरेट, हुक्का यासारख्या माध्यमातून व्यसनाधीनते कडे जाताना दिसत आहेत. भारतीय संस्कृती मधून देश पाश्चात्य संस्कृतीकडे जात असताना सोशल मीडियाद्वारे मुलांच्या मनावर फार मोठ्या प्रमाणात अतिरेक झालेला दिसून येत आहे.
व्यसनाधीनता कमी व्हावी या दृष्टीने पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार साहेब यांनी पुणे शहर पोलिसांना व्यसनमुक्ती अभियान राबवणे बाबतचे आदेश देण्यात आलेले आहेत. याच अनुषंगाने हडपसर पोलिसांच्या वतीने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय, साधना विद्यालय, एस एम जोशी महाविद्यालय तसेच अण्णासाहेब मगर महाविद्यालय यांच्या सहकार्याने हडपसर परिसरात बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

 

या रॅली मध्ये मध्ये हडपसर पोलिस चौकीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या नेतृत्वाखाली हडपसर शहरातील विविध ठिकाणी मुख्य चौकांमध्ये जाऊन अमली पदार्थ दुष्परिणामावर मोटारसायकल वरती बॅनर झळकवत जनजागृती करण्यात आली.

साधनाविद्यालया मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास हडपसरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे, साधना विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव, सहायक पोलिस उपनिरीक्षक दिनेश शिंदे, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ रंजना पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. हडपसरचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी अरविंद गोकुळे यांनी साधना हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना व्यसनांचे परिणाम व त्याचे होणारे तोटे समजून सांगताना व्यसनापासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन केले. लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण व्हावी तसेच व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा या उद्देशाने या रॅलीचे आयोजन केल्याचे सांगितले.

 

बाईक रॅलीची सुरूवात साधना शाळेपासून करण्यात आली,
यामध्ये हडपसर परिसरातील कॉलेजच्या तसेच पोलिस अकादमीच्या सुमारे 200 विद्यार्थी विद्यार्थिनीं सहभाग नोंदवला होता.
रॅली मध्यवर्ती ठिकाणी आली असता हडपसर पीएमपी च्या वतीने सर्वांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
5 किलोमीटरचा प्रवास करत या बाईक रॅलीची सांगता अण्णासाहेब मगर महाविद्यालय येथे करण्यात आली.

 

समारोपावेळी बोलताना विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ रंजना पाटील यांनी पोलिस प्रशासनाने केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले अमली पदार्थांना आळा बसावा आणि समाज निकोप आरोग्यदायी आणि भरभराटीकडे प्रवास करणारा असावा यादृष्टीने पोलिस प्रशासनाने केलेला बाईक रॅलीचा उपक्रम अतिशय समाजोपयोगी असून भविष्यात देखील असे उपक्रम राबवण्यात यावेत असे मत व्यक्त केले.
यावेळी अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अनिल जगताप साधना शाळेचे प्रा. लालासाहेब खलाटे तसेच एस एम जोशीचे प्रा.पठारे यांनी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हडपसर चे सहायक पोलिस उपनिरीक्षक दिनेश शिंदे, पोलिस अमलदार उमेश शेलार यांनी विशेष प्रयत्न केले.