पुणे

महावितरण चे विजेचे खांब बनले केबलधारकांचे कमाईचे साधन विनपरवाना खांबाचा वापर, “कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे” अशी परिस्थिती…!

प्रतिनिधी: रमेश निकाळजे

सध्या पुणे शहर आणि शहराच्या आजूबाजूचा परिसर फार झपाट्याने वाढत आहे त्यामुळे प्रत्येक रस्त्यावर दुचाकी व चार चाकी वाहनांच्या वर्दळीचे प्रमाण जसे वाढत आहे तसेच केबल आणि इंटरनेट चे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वाहतूक कोंडीवर मात्र ठोस अशी उपाययोजना राबवण्यात अजून तरी प्रशासनाला यश आलेले नाही. पण या ज्या इंटरनेटच्या केबल वर प्रशासन काय कारवाई करणार असा प्रश्न पडला आहे.कारण अशा केबल उंचावरून नेने अपेक्षित असते मात्र त्याच केबल काही कालांतराने लोंबकळून खाली आल्यामुळे अनेक अपघात घडल्याच्या घटना पहावयास मिळतात.

 

दोन दिवसापूर्वी सकाळच्यावेळी पुण्यातील अतिशय गजबजलेल्या भागात केबल सदृश्य वायर तुटून खाली पडल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाले पोलिसांना ते सुरळीत करता करता दीड ते दोन तास तारेवरची कसरत करावी लागली. अशीच एक घटना एक महिन्यापूर्वी कोथरूड परिसरात घडली केबल ची किंवा इंटरेरनेट ची वायर रस्त्यात एकदम खाली आली असता त्यात अडकून चार ते पाच टू व्हीलर वाल्याना ती केबल न दिसल्यामुळे त्यात अडकून पडले त्यातील दोघांना डोक्याला गंभीर इजा झाली तर बाकीच्यांना किरकोळ जखम झाली.

 

अशा अनेक छोट्यामोठ्या घटना रोज कुठे ना कुठे घडतात. परंतु हल्ली हे प्रमाण वाढत चालल्याने केबल च्या वायरिंचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशीच घटना काल लोणीकाळभोर परिसरात घडली असती परंतु मोटरसायकल चालकाच्या प्रसंगाधावणाने टळली नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. केबल रस्त्यावर आल्यामुळे एक मोटरसायकल चालक त्यात अडकला मात्र गाडी हळू असल्यामुळे त्याने लगेच गाडी कंट्रोल केली.

 

सर्वात महत्वाचे म्हणजे या केबल अनधिकृत पणे महावितरण चे जे खांब आहेत त्यांच्यावरून टाकल्या जातात.तर काही ठिकाणी झाडावरून सुद्धा टाकल्या जातात.त्या वायरी टाकत असताना कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे असले धोके वाढले आहेत. आता पावसाळा सुरु होत आहे.पावसाळ्यात वाऱ्यामुळे अशा वायरी, केबल सतत खाली घसरून येऊन अपघात घडत असतात. त्यामुळे अशा केबल व वायरिंवर महावितरण काय कारवाई करणार हे पाहावे लागेल.