पुणे

नरेंद्र मोदींचा पुणे दौरा केवळ पुणेकरांची दिशाभूल करणारा- राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप

मोठा गाजावाजा करत पुण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या इतर दौऱ्यांप्रमाणे यावेळी देखील पुणेकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. गेल्या नऊ वर्षात ज्या ज्या प्रकल्पांचे नरेंद्र मोदींनी भूमिपूजन अथवा उद्घाटन केले मग ते स्मार्ट सिटी असो, जायका असेल किंवा पुणे मेट्रो असेल त्या सर्व प्रकल्पांच्या बाबतीत केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुणेकरांची फसवणूक करण्यात आली आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

प्रशांत जगताप पुढे बोलताना म्हणाले, आज पंतप्रधान मोदींनी पुणे मेट्रोच्या ज्या दोन नव्या मार्गीकांचे उद्घाटन केले, त्या मार्गीकांचे जवळपास ३० ते ४० टक्के काम अपूर्ण असताना देखील केवळ पुणेकरांना दिखाऊपणा करत या मर्गिकांचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. गेली ९ वर्षे अपूर्ण प्रकल्प पुणे मधे लोकार्पण झाले आहेत, याबाबत आम्ही येत्या दोन दिवसात फेसबुक लाईव्हद्वारे या दोन्ही मर्गिकांची सत्य परिस्थिती पुणेकरांच्या समोर आणणार आहोत.

पुणे मेट्रोच्या या दोन्ही मार्गिकांमधील जे काम अपूर्ण आहे, ते अत्यावश्यक स्वरूपाचे आहे. ते काम पूर्ण झाल्याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतलीच जाऊ शकत नाही. तरी देखील केवळ दिखाऊपणा म्हणून या मेट्रोच्या कामाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. देशभरात विकास पुरुषाची प्रतिमा मिरवणारे पंतप्रधान मोदी पुण्यात मात्र दरवेळेस पुणेकरांच्या डोळ्यात धूळफेक करतात ,ही बाब पुणेकर विसरणार नाही” ,असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.