पुणेमहाराष्ट्र

पुण्यात हडपसर मधील रामटेकडी पुलाजवळ एसटीचा अचानक ब्रेक फेल; चार ते पाच वाहनांना दिली धडक,प्रवाशी किरकोळ जखमी…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पुण्यात रामटेकडीच्या पुलावर मंगळवारी रात्रीच्या वेळी मोठा अपघात झाला. पुलावर एसटी बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने बसने चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिली. मागील काही दिवसांपासून पुण्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. चांदणी चौकात सतत अपघात होत असतात तसेच काल सकाळी पिरंगुट येथे भरधाव टेम्पोचा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला होता. ही घटना ताजी असतांना रात्री पुन्हा असाच एक अपघात हडपसर येथील रामटेकडी पुलावर झाला.

सांगोला ते स्वारगेट एसटी बस हडपसर येथील रामटेकडी पुलावरून आली असता बस चे ब्रेक अचानक निकामी झाले. यामुळे बसने चार ते पाच वाहनांना धडक दिली. या घटनेत चार ते पाच नागरीक किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर पुणे सोलापूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पुण्यातील हडपसर भाग हा अतिशय वर्दळीचा आहे. या मार्गावर कायम वाहतूक कोंडी असते. दरम्यान, मंगळवारी रात्री या मार्गावर रामटेकडी येथे मोठा अपघात झाला.

सांगोला ते स्वारगेट एसटी बस हडपसर येथील रामटेकडी पुलावरून रात्री 8 च्या सुमारास आल असता ब्रेक फेल झाल्याचे चालकाने वाहकाला सांगितले. बसमध्ये तब्बल 30 प्रवासी प्रवास करत होते.हा प्रकार कळताच गाडीतील सर्व प्रवासी घाबरून आरडाओरड करू लागले. ब्रेक न लागल्याने बस ने रामटेकडी पुलावरील चार ते पाच वाहनांना धडक दिली.

यात काही चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले. तर चार ते पाच नागरीक जखमी झाले. त्यांना तातडीने जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रात्री उशिरापर्यंत ST बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.