पुणेमहाराष्ट्र

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या क्रीडामहोत्सवातून घडतात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू……. सुनेत्रा पवार पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन

पुणे, ता. 12 – खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून विद्यार्थ्यांचे करियर घडविण्याचे एक महत्वाचे माध्यम आहे. खेळामुळे संघकार्य, समन्वय, आत्मविश्वास, नियोजन हे गुण आत्मसात होतात. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ गेली नऊ वर्षांपासून क्रीडामहोत्सवातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळवरील खेळाडू घडविण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सासवड (ता.पुरंदर) येथे व्यक्त केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने सासवड येथील वाघिरे महाविद्यालयातील जिल्हा क्रीडामहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होत्या. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू पराग काळकर, जिल्हा क्रिडाधिकारी महादेव कसगावडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार अशोक टेकवडे, बाळासाहेब पारगे, बंडू जगताप, डॉ. एम. एस. जाधव, राजेश चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, उत्तम धुमाळ, हनुमंत पवार, अमित झेंडे त्याचप्रमाणे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड.संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. मनोहर चासकर, डॉ. पंडीत शेळके, डॉ. नितीन घोरपडे, डॉ. राजश्री चव्हाण तसेच शाखाप्रमुख आणि क्रीडाशिक्षकांनी या महोत्सवाचे नियोजन केले.

पवार पुढे म्हणाल्या की या स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढण्यास पोषक वातावरण निर्माण होते. ग्रामीण भागातील बहुजन समाजातील खेळाडू या स्पर्धेतून तयार होवून राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव गाजवतील. डॉ.काळकर म्हणाले की या संस्थेचा क्रीडामहोत्सव हा राष्ट्रीय दर्जाच्या महोत्सवाला साजेसा आहे. खेळामध्ये जय पराजयापेक्षा सहभाग महत्वाचा आहे. खेळातून व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधता येतो .

कसगावडे म्हणाले की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्हा नियोजनामध्ये क्रीडा धोरणात मोठी आर्थिक तरतूद केली आहे. नोकरीतही पाच टक्के राखीव ठेवल्या आहेत. त्याचा फायदा राज्यातील खेळाडूंना होईल. गारटकर यांनी क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातून संस्कारक्षम पिढी घडत असून ही संस्था करत असलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

प्रास्ताविकात ॲड.संदीप कदम यांनी संस्थेच्यावतीने घेतल्या जात असलेल्या क्रीडामहोत्सवाचा उद्देश स्पष्ट केला. तसेच जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचेही यापुढे आयोजन केले जाणार असून त्यासाठी भरघोस बक्षिसे दिली जातील असे जाहीर केले. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते क्रिडाज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. छात्रसेना, स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी शानदार संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली. विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. शिवछत्रपती पुरस्कार विजेता देवेंद्र सुर्वे याने खेळाडूंना शपथ दिली. यावेळी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. आभार प्राचार्य डॉ.पंडीत शेळके यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा खोदडे, डॉ. किरण गाढवे, प्रा. समीर कुंभारकर यांनी केले.

फोटोओळ – सासवड (ता.पुरदंर) येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या क्रीडामहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी क्रीडाज्योतीचे प्रज्वलन करताना सुनेत्रा पवार