पुणेमहाराष्ट्रहडपसर

“खोतीदारांना मांजरी उपबाजारात प्रवेश अन संचालक मंडळाच्या जाचक अटी… “विनाअट प्रवेश द्या, संचालक मंडळाच्या कारभाराची चौकशी करा अन्यथा उपोषण चालूच

 – बाळासाहेब भिसे यांची प्रकृती खालावली”

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने अतिशय जाचक अटी घालून खोतीदारांना मांजरी उपबाजारात व्यवसाय करण्यास परवानगी दिली संचालकांच्या या जाचक अटींमुळे खोतीदार व शेतकरी उध्वस्त होणार असून उपोषण करणारे आंदोलक व शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे कारस्थान रचले जात आहे, संचालकाच्या या जुलमी निर्णयास आमचा विरोध असून आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचे बाळासाहेब भिसे यांनी सांगितले.
पाचव्या दिवशी उपोषणकर्ते भिसे यांची प्रकृती खालावली असताना उपोषणाची दखल न घेता शेतकरी संघटनेला संचालक मंडळाने पत्र दिले आहे.

चार महिन्यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांनी मांजरी उपबाजारात खोतीदार व्यापाऱ्यांना मज्जाव केला, त्यांचे परवाने रद्द केले, या विरोधात खोतीदार व शेतकरी यांनी आंदोलन केले तसेच निवेदन देऊन वेळोवेळी पाठपुरावा केला, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही संचालक मंडळांना तोडगा काढण्यास सांगितले मात्र संचालकांच्या अंतर्गत कलहामुळे यामध्ये निर्णय होऊ शकला नाही.

अखेर संचालकांची बैठक झाली अन अटी व शर्थी टाकून खोतीदारांना मांजरी उपबाजारात प्रवेश देण्याचा निर्णय झाला, या अटी अतिशय जाचक असून यामध्ये हवेली तालुक्यातील माल काढावा, एका दिवशी 2000 जुडी आणावी, मदतनीस आणू नये, शेतकऱ्यांची सर्व माहिती कागदपत्रासह कार्यालयात जमा करावी, खोतीबाबत 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार करून जमा करावा, वाहनात माल विक्री न करता शेडमध्ये करावा, एक वाजेपर्यंतच माल आणावा, ही तात्पुरती परवानगी असून कोरेगावमूळ येथे खोतीदारांसाठी मार्केट मध्ये स्थलांतर करणार तेव्हा मांजरी बाजारात खोतीदारांना बंद करणार अशा जाचक अटींमुळे पुरंदर, दौंड, हवेली मधील खोतीदार अन शेतकरी उध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

हडपसर पोलीस स्टेशनचे एलआयबी चे दिनेश शिंदे, उमेश शेलार यांनी आंदोलक बाळासाहेब यांची भेट घेतली, अन उपोषण माघारी घेण्याचे आवाहन केले परंतु संचालक मंडळांनी घातलेल्या जाचक अटी आम्हाला मान्य नाही, कोणत्याही नियम अटी न घालता, खोतीदारांना प्रवेश द्यावा संचालक मंडळाच्या कारभाराची चौकशी व्हावी ही मुख्य मागणी असून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका भिसे यांनी घेतली आहे. दरम्यान माजी उपमहापौर निलेश मगर, भारती रमेश तुपे, महेंद्र बनकर, बाळासाहेब शंकर तुपे, राजेंद्र गायकवाड, सुमंत तुपे, विशाल लेंडेश्वर, तानाजी तारू, संदीप लहाने, माजी नगरसेवक शिवाजी पवार, कन्हेया पालेशा यांनी बाळासाहेब भिसे याना भेटून उपोषणला पाठिंबा दिला. 

संचालक मंडळाचा खोतीदारांवर इतका राग का?
खोतीदार व्यापारी यांचा शेतकऱ्यांना कोणताही त्रास नसताना छोटे शेतकरी मोठे शेतकरी असा वाद निर्माण करून खोतीदारांवर जाचक अटी टाकणाऱ्या संचालक मंडळाला खोतीदारांचा एवढा राग का असा प्रश्न निर्माण झाला आहे, केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवत असताना संचालक मंडळाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे तीन तालुक्यातील शेतकरी अडचणीत येणार आहेत.

खोतीदार मागण्याबाबत पणन संचालकांना पत्र देणार – आ.अशोक पवार
उपोषणाचा पाचवा दिवस आहे, दरम्यान शिरूर मतदार संघाचे आमदार अशोक पवार यांनी आंदोलन बाळासाहेब भिसे यांची भेट घेतली व सर्व विषय समजून घेतला, या विषयात पणन संचालकांना पत्र देऊन मतदारांचा प्रश्न सोडविण्यास पुढाकार घेणार असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.