पुणे

खुशखबर 1 हजार 700 हून अधिक पदांच्या कर्मचारी भरतीसाठी पुणे मनपा प्रशासनाचा राज्य शासनाकडे प्रस्ताव…..

पुणे (न्यूजलाईन)

पुणे महानगरपालिकेच्या नोकरीसाठी डोळे लावून बसलेल्यांसाठी खूश खबर आहे. तब्बल 1 हजार 700 हून अधिक पदांच्या कर्मचारी भरतीसाठी महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. पुढील महिनाभरात या भरती प्रक्रियेस मंजुरी मिळेल, असा विश्‍वासही प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
महापालिकेच्या एकूण मंजूर पदांची संख्या 17 हजार 600 इतकी आहे. मात्र, त्यामधील तब्बल 3 हजार 500 हून अधिक पदे रिक्त आहेत, तर या एकूण मंजूर पदांमध्ये आरोग्य, अग्निशमन, पाणीपुरवठा अशा अत्यावश्यक सेवांची मंजूर पदांची संख्या 5 हजार 296 इतकी आहे. त्यामधील 1 हजार 700 हून अधिक पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्तच आहेत. त्याचा परिणाम थेट महापालिकेच्या कामकाजावरही होत आहे. त्यामुळे या रिक्तपदांच्या भरतीसाठी महापालिकेने राज्य शासनाकडे परवानगी मागितली होती. यासंदर्भात पंधरा दिवसांपूर्वी राज्य शासनाने मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीला महापालिकेच्या सेवक वर्ग विभागाचे प्रमुख अनिल मुळे यांच्यासह वित्त, विधी, नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यात महापालिकेला ज्या अत्यावश्यक सेवांसाठी कर्मचारी भरती करायची आहे. त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव पाठवा, त्यास मंजुरी दिली जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाने रिक्त असलेल्या अत्यावश्यक सेवांच्या 1 हजार 700 पदांच्या कर्मचारी भरतीचा प्रस्ताव शासनाला नुकताच पाठविला आहे. निवडणुकांच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या प्रस्तावाला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात या भरती प्रक्रियेस मंजुरी मिळेल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

आरोग्य विभागातील पदांची संख्या मोठी

महापालिकेच्या आरोग्य विभागाची रुग्णालये व दवाखान्यांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि संबंधित कर्मचार्‍यांची मोठी कमतरता आहे. त्यामुळे रिक्त पदांमध्ये या पदांची संख्या मोठी आहे. याशिवाय अग्निशमन, स्थापत्य, विद्युत, यांत्रिकी या विभागांशी संबंधित पदांचाही यामध्ये समावेश आहे.

मंजुरीसाठी थेट भरती प्रक्रिया

राज्य शासनाकडून या पदांच्या भरतीस परवानगी मिळाल्यानंतर लगेच भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. जाहिरात देऊन अर्ज मागवून पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

0 0 votes
Article Rating
99 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments