प्रतिनिधी – स्वप्नील कदम
लोणी काळभोर : लोणी काळभोर येथील मागासवर्गीय नागरिकांची घरे गेली पन्नास वर्षे शासनाच्या नावावर नियमित झालेली नसल्याने अखेर नागरिकांचा संताप उसळला आहे. यासोबतच लोणी काळभोर ते रामदरा या ५२०० मीटर रस्त्याच्या भूसंपादनातील भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचे काम आणि शेतकऱ्यांची झालेली फसवणूक या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
अखिल मांजराईनगर नागरिक कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन २७ ऑक्टोबरपासून लोणी काळभोर पुणे–सोलापूर रोडलगतच्या बाजार मैदानावर दररोज दुपारी १ ते २ या वेळेत सुरू आहे.
सदर विषयाबाबत मा. उपविभागीय अधिकारी हवेली उपविभाग पुणे यांच्या अध्यक्षतेखाली १२ जुलै २०२४ रोजी संयुक्त बैठक घेण्यात आली होती. मात्र त्यानंतर आवश्यक ती पुढील कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सर्कल ऑफिसर थेऊर यांनी २९ सप्टेंबर २०२५ रोजी तहसीलदार हवेली यांच्याकडे अहवाल सादर केला असतानाही अद्याप संयुक्त बैठक आयोजित करण्यात आलेली नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, लोणी काळभोर–रामदरा रस्ता या कामात मोठ्या गैरप्रकारांचा आरोप करण्यात आला आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना (एमएसआरडीसी) अंतर्गत संबंधित अभियंत्यांनी शासनाची दिशाभूल करून “जुन्या रस्त्याची दुरुस्ती” असा भ्रामक शब्दप्रयोग वापरला असून, खोट्या कागदपत्रांच्या आधारे बोगस परवानगी मिळवली असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.
या रस्त्यासाठी कोणतेही भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे न पाठवता थेट काम सुरू करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांना रेडी रेकनर दराने पाचपट नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, साईड पट्ट्यांचे काम झालेले नाही, तरीही ठेकेदारास पूर्ण रक्कम अदा करण्यात आली आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
शासनाची फसवणूक, खोटे दस्तऐवज, वन विभागाकडून घेतलेली बोगस परवानगी आणि शेतकऱ्यांची झालेली फसवणूक — या सर्व प्रकरणांतील दोषी अधिकारी व ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी नागरिकांची प्रमुख मागणी आहे.
या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते संजय भालेराव, ग्रामपंचायत प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी, रूपाली काळभोर, अॅड. अनिता गवळी, निखिल काळभोर, सुरेश साळुंखे, सुभाष साळुंके, दिपाली घाडगे, अजिंक्य उपाध्ये, प्रदीप शेडगे आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
