मुंबई

‘लेडी सिंघम’ पीआय माधवी राजेकुंभार यांनी धाडस केले अन समीर नार्वेकरला गुडघ्यावर आणले !

हातावर पोट असणाऱ्यांपासून राज्यातील बडे राजकारणी, सत्तेतील मंत्री-आमदार आणि प्रशासनातील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून महाराष्ट्राबाहेर धूम ठोकलेल्या TWJ कंपनीचा मालक आणि व्यवस्थापकीय संचालक समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकर आणि संचालक अमीत पालम या तिघांना ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी बेड्या ठोकल्या.

पोलिस आणि राजकारण्यांची फसवणूक करून पळालेल्या आणि पोलिसांच्या नजरेत न येणाऱ्या समीर नार्वेकर आणि त्याच्या पत्नीच्या मुसक्या आवळण्यात ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

राज्यभरातील आठ जिल्ह्यांतून पोलिसांकडे समीर नार्वेकरच्या विरोधात प्रचंड तक्रारी आल्या होत्या. तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्यावरून पोलिसांकडे बोट दाखवले जात होते. ठाणे पोलिसांवरही समीर नार्वेकरला पाठीशी घालत असल्याचा आरोप होता. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त पराग मणेरे हे वेगवेगळ्या पध्दतीने तपास करण्याबाबत प्रयत्नशील होते.

या प्रकरणातील इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर माधवी राजेकुंभार आणि त्यांच्या टीमने आठवडाभर गुजरातमध्ये तळ ठोकून या प्रकरणातील आरोपी समीर नार्वेकर, त्याची पत्नी यांच्यासह तिघांना ताब्यात घेतले आहे.
विशेष म्हणजे, महिला ऑफिसरनेच ही कारवाई करून समीर नार्वेकर आणि त्याच्या कंपनीच्या काळ्या कारभाराचा पर्दाफाश केल्याचे दिसत आहे.
मंत्री, आमदार, खासदार अन् वरिष्ठ आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना कोट्यवधी रूपयांचा चुना लावून ‘धूम’ ठोकलेल्या समीर नार्वेकरला पोलिसांनी बेड्या
ठोकल्याने या प्रकरणातील आणखी काळेबेरे उघड होण्याची शक्यता आहे. राजेकुंभार यांच्यासह नितीन ओवळेकर, गुरुप्रसाद तोडणकर, निशिकांत पाटील, कविता कोळपे, योगेश चौगुले यांचा टीममध्ये समावेश होता.