पुणेकरांचा श्वास अक्षरशः कोंडतोय… शहर धूळ आणि धुराच्या विळख्यात अडकलं आहे.मेट्रोची कामं, उड्डाणपूल, रस्ते खोदाई आणि वाढतं बांधकाम… या सगळ्यामुळे पुण्यातील हवा दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे. हडपसर, मुंडवा, कोंढवा, बाणेर, हिंजवडी, सिंहगड रोड—हे भाग प्रदूषणाचे ‘हॉटस्पॉट्स’ बनले आहेत.AQI अनेकदा 150 ते 250 च्या दरम्यान जातोय, म्हणजेच हवा ‘अनहेल्दी’ श्रेणीत! PM 2.5 आणि PM 10 सारखे सूक्ष्म कण थेट फुफ्फुसात जात आहेत.
यामागचं मोठं कारण म्हणजे बांधकामांवर नियंत्रणाचा अभाव… RMC डंपरमधून सांडणारे सिमेंट, धुळीवर नियंत्रणासाठी ग्रीन नेट्सचा अभाव आणि रस्त्यावर उडणारी माती.याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे—ज्येष्ठांना दमा, मुलांमध्ये श्वसनाचे आजार, तर दुचाकीस्वारांना डोळ्यांची जळजळ आणि त्वचेचे विकार वाढले आहेत.महापालिकेने अँटी-स्मॉग गन आणि AQI डॅशबोर्ड लावले असले, तरी नागरिकांचा आरोप आहे—ही फक्त ‘दिखावा’ कारवाई आहे.आता गरज आहे ती कडक अंमलबजावणीची… अन्यथा ‘स्मार्ट सिटी’ बनत असलेलं पुणे ‘रुग्णांचं शहर’ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
