पुणे पोलीस दलात एक गंभीर प्रकार समोर आला आहे. काळेपडळ पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यरत असलेल्या दोन पोलीस हवालदारांना ऑन ड्युटी असताना मद्यधुंद अवस्थेत आढळल्याने तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी ही कारवाई केली असून या घटनेमुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
पहिले हवालदार सचिन जाधव हे लोणी काळभोर येथील MIT (ADT) विद्यापीठात पोलीस भरती 2024-25 च्या बंदोबस्तावर असताना मद्यप्राशन करून गैरवर्तन करत असल्याचे समोर आले.
दुसरे हवालदार संजय कराड हे उंड्री पोलीस चौकीवरील ड्युटी सोडून मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवत काळेपडळ पोलीस ठाण्यात आले. यावेळी त्यांनी एका महिला तक्रारदाराला धडक दिल्याची माहिती आहे.
दोघांची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता रक्तात अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले.
त्यांच्या वर्तनामुळे नियमांचे उल्लंघन झाल्याने त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
ही कारवाई पुणे पोलीस दलातील शिस्त आणि प्रतिमा जपण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
