वृक्षदाई प्रतिष्ठानला जनसेवा पुरस्कार २०२६! मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते गौरव; १.०१ लाखांचा धनादेश

Rokhthok Maharashtra 9 0

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षदाई प्रतिष्ठानचा गौरव! जनसेवा पुरस्कार २०२६ प्रदान; एक लाख एक हजार रुपयांचा धनादेश
पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी समर्पित असलेल्या श्रीक्षेत्र देहू येथील ‘वृक्षदाई प्रतिष्ठान’ या संस्थेला यंदाचा प्रतिष्ठित ‘जनसेवा पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. जनसेवा सहकारी बँक लिमिटेड, हडपसर, पुणे यांच्या वतीने एक लाख एक हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन संस्थेचा गौरव करण्यात आला.
हडपसर येथील विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहात आयोजित बँकेच्या वर्धापन दिन समारंभात केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र हिरेमठ, उपाध्यक्ष रवी तुपे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष पोळेकर, वृक्षदाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ तथा कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. नंदकुमार मुलमुले उपस्थित होते.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जनसेवा सहकारी बँकेच्या ५४ वर्षांच्या विश्वासार्ह वाटचालीचे कौतुक केले. १९७२ मध्ये हडपसरमध्ये सुरू झालेली ही बँक आज पुण्यातील विश्वासार्ह बँक म्हणून ओळखली जाते. सहकार क्षेत्रात विश्वास आणि समाजसेवेची भावना महत्त्वाची असून, जनसेवा बँकेची वाटचाल हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर वृक्षदाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे यांनी हा सन्मान केवळ संस्थेचा नसून वृक्षलागवड, संगोपन आणि संवर्धनासाठी मेहनत घेणाऱ्या हजारो हातांचा गौरव असल्याची भावना व्यक्त केली. हा पुरस्कार भविष्यातील पर्यावरण संवर्धनाच्या कार्यासाठी नवी ऊर्जा देणारा असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मागील आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जनसेवा सहकारी बँकेचे सेवक दत्तात्रय गाडे, संतोष शिंदे आणि आरती हगवणे यांना ‘गुणवंत सेवक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. नंदकुमार मुलमुले यांनी ‘सुखाचा शोध’ या विषयावर मार्गदर्शन करताना यश, सुख, आनंद आणि समाधान यांतील फरक स्पष्ट केला. तुलना टाळून निकोप स्पर्धा करावी आणि निरपेक्ष भावनेने समाजासाठी काम केल्यास खरा आनंद मिळतो, असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष पोळेकर यांनी स्वागत केले, तर अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी बँकेच्या आर्थिक कामगिरीचा आढावा घेतला. सुहास शामगावकर यांनी स्वागतगीत सादर केले, अभिजित केळकर यांनी मानपत्राचे वाचन केले, तर स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.
विशेष म्हणजे, २४ ऑक्टोबर १९९८ पासून जनसेवा सहकारी बँकेने समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्याची पुरस्कार परंपरा सुरू ठेवली आहे.
पर्यावरण संवर्धनापासून समाजसेवेपर्यंत योगदान देणाऱ्या संस्थांचा सन्मान म्हणजेच जनसेवा पुरस्कार!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.