पुण्यात लाल सिग्नलला थांबला म्हणून तरुणाला मारहाण? जहांगीर चौकातील घटना

Rokhthok Maharashtra 5 0

पुण्यात ट्रॅफिकचे नियम पाळणंही आता महागात पडणार का? लाल सिग्नलला दुचाकी थांबवली म्हणून तरुणाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जहांगीर हॉस्पिटल चौकात घडलेल्या या प्रकारामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टनुसार, दुपारी ३ वाजून ८ मिनिटांच्या सुमारास एक तरुण ज्युपिटर स्कूटरवरून जात होता. सिग्नल लाल झाल्याने त्याने स्कूटर थांबवली. त्याचवेळी मागून आलेल्या एका चारचाकी गाडीने त्याच्या स्कूटरला धडक दिली.
आरोपानुसार, कारमधून उतरलेल्या दोन व्यक्तींनी नुकसानाची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी, सिग्नलला गाडी का थांबवली, असा जाब विचारत तरुणाला मारहाण केली.
या घटनेनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. वाहतूक नियम पाळणाऱ्या नागरिकांनाच मारहाणीचा सामना करावा लागत असेल, तर रस्त्यावरील सुरक्षिततेचं काय, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
मात्र, या प्रकरणातील आरोपींवर कारवाई झाली आहे का, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.