पुणे

“रुपाली चाकणकरांच्या बहिणी अडचणीत? शिर्डी पोलिसांची कारवाई”

राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांच्या बहिणी प्रतिभा चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

भोंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याच्याविरोधात एका महिलेने अत्याचाराची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याच्याविरोधात फसवणूक आणि महिलांवरील अत्याचाराचे अनेक गुन्हे समोर आले आहेत. या प्रकरणाची चौकशी सध्या एसआयटीकडून सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणात शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस बजावली आहे. सावकारी आणि आर्थिक व्यवहारांच्या तपासादरम्यान समता पतसंस्थेतील काही खात्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या खात्यांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची नावे असली तरी नॉमिनी म्हणून अशोक खरात याचे नाव असल्याचे आढळले आहे. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे, प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाच्या नावावरही अशा चार खात्यांची नोंद आढळली आहे. त्यामुळे त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.

पुढील पाच दिवसांत शिर्डी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 33 खातेदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

दरम्यान, अशोक खरातसोबत काही राजकीय व्यक्तींचे फोटो समोर आल्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळं वळण मिळालं असून राज्यात खळबळ उडाली आहे.