पुणे शहरात अनधिकृत केबल्सचा मोठा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. शहरात तब्बल ३६०० किलोमीटर लांबीच्या अनधिकृत केबल्स टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
महापालिकेच्या आदेशानंतर विद्युत विभागाने कारवाई करत वाघोली, विमाननगर आणि नगर रस्ता परिसरात मोठ्या प्रमाणात केबल्स तोडल्या. सलग तीन दिवस चाललेल्या या कारवाईत सुमारे २४ किलोमीटर केबल्स कापण्यात आल्या.
मात्र ही कारवाई फार काळ टिकली नाही. अधिकारी केबल तोडत पुढे जात असताना मागेच इंटरनेट कंपन्यांनी पुन्हा केबल जोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे कारवाई क्षणिक ठरल्याचं दिसून आलं.
या कारवाईमुळे काही वेळ इंटरनेट सेवा खंडित झाली होती, पण कंपन्यांनी तात्काळ केबल पुन्हा टाकून सेवा सुरू केली.
महापालिकेच्या पथकाने १५ कर्मचाऱ्यांसह ही मोहीम राबवली असून पुढेही कारवाई सुरू ठेवणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
दरम्यान, अनधिकृत केबल्समुळे अपघात होण्याचा धोका वाढला असून, कर बुडवून लाखो रुपयांचा व्यवसाय केला जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यामुळे फौजदारी कारवाईशिवाय हा प्रकार थांबणार नाही, अशी नागरिकांची मागणी आहे.
