पुणे

शिवसेनेच्या संघर्षाला यश! दोराबजी मॉलसमोरील पाण्याच्या टाक्यांचं नागरिकांच्या हस्ते लोकार्पण

महादेववाडी परिसरातील नागरिकांचा अनेक वर्षांपासूनचा पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय… आणि याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४१ मध्ये दोराबजी मॉलसमोरील पाण्याच्या साठवण टाक्यांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
विशेष म्हणजे… हा कार्यक्रम कोणत्याही मोठ्या राजकीय नेत्यांच्या हस्ते नाही, तर सर्वसामान्य नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “हा संघर्ष शिवसेना आणि नागरिकांनी एकत्र येऊन केला. त्यामुळे या कामाचं श्रेय देखील जनतेलाच दिलं पाहिजे.”

 

या भागात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत होता. महिलांना पाण्यासाठी तासन्तास वाट पाहावी लागत होती. अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नव्हता. मात्र शिवसेनेने स्थानिक नागरिकांना सोबत घेत सातत्याने आंदोलन, पाठपुरावा आणि संघर्ष सुरू ठेवला.
अखेर या लढ्याला यश आलं आणि आता या साठवण टाक्यांमधून नियमित पाणीपुरवठ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.
लोकार्पण सोहळ्यावेळी नागरिक व महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. “आमच्या दैनंदिन आयुष्यातला मोठा प्रश्न सुटला,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, “राजकीय दिखावा न करता लोकांसाठी केलेलं काम जनतेलाच समर्पित करणं, हीच खरी लोकसेवा,” असंही प्रमोद नाना भानगिरे यांनी यावेळी सांगितले