पुणे

14 कोटींच्या जमीन घोटाळ्यात मोठी अटक!

अहिल्यानगरमध्ये गाजलेल्या 14 कोटी रुपयांच्या जमीन फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात अंकुश चत्तर हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि भाजपचा माजी नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यासह महेश कुऱ्हे यांना अटक करण्यात आली आहे.
दोन्ही आरोपी नाशिक मध्यवर्ती कारागृहात असताना आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेत अहिल्यानगर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
डॉ. अनिल आठरे यांच्या 22 एकर जमिनीच्या व्यवहारात तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार 8 नोव्हेंबर 2025 रोजी दाखल झाली होती. या प्रकरणात एकूण 28 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे.
या तपासात यापूर्वी माजी सरपंच अमोल जाधव यालाही अटक झाली होती. स्वप्नील शिंदेचा भाऊ सचिन शिंदे हाही आरोपी असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेकडून या व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून पुढील तपासाला वेग आला आहे.