पुणे

पुण्यात २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; सासू-सासरे अटकेत, पत्नी फरार

पुण्यातील उरुळी कांचन येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पत्नी आणि सासरच्या कथित मानसिक छळाला कंटाळून २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मृत तरुणाचे नाव निखील शांताराम कांचन असे असून, लग्नानंतर काही दिवसांतच पत्नी, सासू आणि सासऱ्यांकडून त्याला पैशांसाठी आणि इतर कारणांवरून सतत मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे.
निखीलच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्याला वारंवार अपमानास्पद बोलून मानसिक दबाव टाकला जात होता.
या सततच्या त्रासामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी निखीलच्या भावाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सासू आणि सासऱ्याला अटक केली आहे.
दरम्यान, मुख्य आरोपी असलेली पत्नी फरार असून तिचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.