पुणे

मोठ्या आवाजातील गाण्यांवरून शेजाऱ्यावर दांडक्याने हल्ला; इंदोरीत खळबळ!

मावळ तालुक्यातील इंदोरी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मोठ्या आवाजात गाणी लावण्याच्या कारणावरून झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचला.
ठाकरवस्तीमध्ये शेजाऱ्यावर लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.
महेश शंकर शिंदे यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, २८ जूनच्या रात्री आरोपी दिपक गायकवाड हा महेश शिंदे यांच्या घरी आला आणि मोठ्या आवाजात गाणी लावल्याच्या कारणावरून वाद घालत लाकडी दांडक्याने त्यांच्या डाव्या हातावर, डोक्यावर, कानावर आणि मानेवर हल्ला केला.
या हल्ल्यात महेश शिंदे यांच्या कानातून रक्तस्राव झाला.
वाद सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी रिकी शिंदे यांनाही आरोपीच्या पत्नीने शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.