पुणे

पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त, गृहमंत्री राजीनामा द्या : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी

गेल्या वर्षभरापासून पुणे शहराची कायदा व सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. हिट अँड रन, अमली पदार्थ, कोयता गँग, गोळीबार अशा घटना नित्याच्याच झाल्या आहेत.
यावर कळस म्हणून गेल्या २ दिवसात पोलिस अधिकाऱ्यांना जिवंत पेटवण्याचा प्रयत्न, पोलिस कर्मचाऱ्यांना चिरडून फरार अशा घटना घडल्या आहेत. स्वतः पोलिसही सुरक्षित नसल्याने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निष्क्रीय कारभार पुन्हा उघड झाला आहे. गृहमंत्र्यांच्या निष्क्रियतेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला असून या निष्क्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या या आंदोलनात “गृहमंत्री राजीनामा द्या, पूर्णवेळ प्रचार करा, तिघाडी सरकार गुन्हेगारांचे सरकार, पोलिसांना अभय द्या फडणवीस राजीनामा द्या” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता.
यावेळी प्रशांत जगताप यांच्यासह चंद्रशेखर धावडे, कणव चव्हाण, पूजा काटकर, मीनाताई पवार, दिपाली कवडे, रोहन पायगुडे, अर्जुन गांजे, मयूर गायकवाड, रूपाली शेलार, काकासाहेब चव्हाण, मंगेश मोरे, प्रवीण आल्हाट, योगेश पवार उपस्थित होते.

गृहमंत्री फडणवीस यांचा पूर्ण वेळ सत्तेसाठी इतरांचे पक्ष, घर फोडण्यात जातो. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी खरंतर गुन्हेगारांची फोडाफोडी केली पाहिजे. त्यांना हे शक्य नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन पूर्णवेळ राजकारण करावं. – प्रशांत जगताप