पुणे

बीडमध्ये गँगचा राडा! तरुणावर कत्ती आणि लोखंडी रॉडने हल्ला, जयराम चाटेचे नाव चर्चेत पर्यायी टायटल

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक गुन्हेगारी घटना समोर आली आहे. केज तालुक्यातील तांबवा परिसरात संग्राम चाटे या तरुणावर पाच जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपींनी आधी त्याला अडवून डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि त्यानंतर कत्ती आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात संग्राम चाटे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर केज उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

मारहाण करताना आरोपींनी “तुमचा बाप जयराम चाटे उद्या येतोय” आणि “आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे 1313 तुला दाखवतो” असे म्हणत धमकी दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणातील हल्लेखोर जयराम चाटे आणि कृष्णा आंधळे यांच्या टोळीतील असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

 

 

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याला भावाच्या बाराव्याच्या विधीसाठी पोलीस बंदोबस्तात काही तासांसाठी तुरुंगाबाहेर येण्याची न्यायालयाने परवानगी दिली होती.
या पार्श्वभूमीवर हा हल्ला घडल्याने बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.