सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात आज एक अतिशय भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला आहे. तांदूळवाडी गावाजवळ भाविकांना घेऊन जाणारी पिकअप गाडी थेट विहिरीत कोसळल्याने आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सहा महिन्यांच्या चिमुकल्याचाही समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रांजणी गावातील भाविक म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परतत असताना तांदूळवाडीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली.
या दुर्घटनेत पूजा अमोल सातोरे, पूजा बालाजी बावचे, अश्विनी संदीप बावचे, तसेच तीन अल्पवयीन मुले आणि सहा महिन्यांचा समर्थ बालाजी बावचे यांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत या अपघाताच्या त्रिस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच रस्त्यालगत असलेल्या विहिरींचा सर्व्हे करून त्यांना संरक्षण कठडे बसवण्याच्या सूचनाही देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
विहिरीत पिकअप कोसळून 8 जण ठार | 6 महिन्यांच्या चिमुकल्याचाही मृत्यू
