पुणे

“तुझं पनीर खराब!” अडीच लाखांची खंडणी रीलस्टार रंगेहात अटक

राज्यात अन्न आणि औषध प्रशासनाकडून भेसळीविरोधात धडक कारवाया सुरू असताना, त्याच कारवाईचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे.
मुलुंडमधील ‘पंजाब पनीर’ या नामांकित दुकानाच्या मालकाला बदनाम करण्याची धमकी देत तब्बल अडीच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका रीलस्टारला मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. रणदीप गुजराल असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीने दुकानातील पनीर आणि दुग्धजन्य पदार्थ निकृष्ट असल्याचा खोटा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच आपले न्यूज आणि सोशल मीडिया अकाउंट वापरून दुकानाची प्रतिमा खराब करण्याची भीती दाखवत अडीच लाख रुपयांची मागणी केली.
प्रतिष्ठेला धक्का बसू नये म्हणून व्यावसायिकाने सुरुवातीला ५० हजार रुपये दिले. मात्र आरोपीने आणखी दोन लाखांची मागणी सुरूच ठेवली. अखेर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पोलिसांनी सापळा रचून १५ जून रोजी एक लाख रुपयांचा हप्ता स्वीकारताना रणदीप गुजरालला रंगेहात अटक केली. या प्रकरणात आरोपीच्या कुटुंबातील इतर सदस्यांचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून तपास सुरू आहे.