पुणे

शाळा प्रवेशात VIP संस्कृती? सामान्य पालकांना हेलपाटे आंदोलनाचा इशारा!

शाळा प्रवेश प्रक्रियेत सर्वसामान्य पालकांवर अन्याय होत असून लोकप्रतिनिधींच्या शिफारशीवर तात्काळ प्रवेश दिले जात असल्याचा गंभीर आरोप करत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल उर्फ नाना तुपे यांनी राज्य सरकार आणि शिक्षण विभागाकडे तीव्र निषेध निवेदन सादर केले आहे.
तुपे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आज सर्वसामान्य पालक आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी शाळांचे उंबरठे झिजवत आहेत. “जागा नाही”, “उद्या या”, “यादी नंतर लागेल” अशी उत्तरे देऊन पालकांना वारंवार हेलपाटे मारायला लावले जात आहे. मात्र दुसरीकडे एखाद्या नगरसेवक, आमदार किंवा खासदाराचा फोन अथवा शिफारस पत्र आले की काही मिनिटांत प्रवेश निश्चित केला जातो.
हा प्रकार शिक्षणाचा अधिकार आणि संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकाराचा भंग करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शाळा ही ज्ञानाचे मंदिर असून ती राजकीय दबावाचे केंद्र बनू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
यावेळी संघटनेने काही महत्त्वाच्या मागण्याही केल्या आहेत. शाळांमध्ये दररोज झालेल्या प्रवेशांची आणि रिक्त जागांची माहिती सार्वजनिक करावी, पालकांसाठी विशेष हेल्पलाईन सुरू करावी, लोकप्रतिनिधींच्या शिफारशीवर होणारे प्रवेश बंद करावेत आणि अर्जाच्या क्रमाने पारदर्शक प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच सर्वसामान्य पालकांना विनाकारण त्रास देणाऱ्या शाळा प्रशासन आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, शिक्षण विभागाने तात्काळ दखल न घेतल्यास पालक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही अमोल नाना तुपे यांनी दिला आहे.