पुणे शहरात वाढलेल्या अनधिकृत होर्डिंग्जविरोधात आता मोठी कारवाई होणार आहे. पुणे पोलिस आणि पुणे महानगरपालिका प्रशासनाने संयुक्तपणे मोठा निर्णय घेतला असून येत्या आठ दिवसांत शहरातील सर्व बेकायदा होर्डिंग्ज हटवण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
पुण्याचे पोलिस आयुक्त Amitesh Kumar यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी महापालिका आयुक्त Navalkishore Ram आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अनधिकृत होर्डिंग्जमुळे पुणे शहराचे विद्रुपीकरण होत असून पावसाळ्यात या होर्डिंग्जमुळे मोठे अपघात आणि सुरक्षेचे धोके निर्माण होतात. त्यामुळे पोलिस आणि महापालिका प्रशासन उद्यापासून संयुक्त मोहीम राबवणार आहेत.
फक्त होर्डिंग्ज काढण्यावरच कारवाई थांबणार नाही, तर बेकायदा जाहिराती छापणाऱ्या आणि लावणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.
दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील तब्बल ४०० संवेदनशील ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी पाणी साचू नये यासाठी महापालिकेकडून कामे वेगात सुरू करण्यात येणार आहेत.
यासोबतच रस्त्यांवर पडून असलेल्या बेवारस वाहनांवर टोईंगद्वारे कारवाई केली जाणार असून प्रत्येक वॉर्डमध्ये स्वतंत्र डंपिंग यार्ड तयार केले जाणार आहेत.
शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांवर तसेच फुटपाथवरील अनधिकृत हॉकर्सवरही कठोर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा होर्डिंग्ज उभारण्यात आल्याचा मुद्दा रोखठोक महाराष्ट्र न्यूजने यापूर्वी उचलून धरला होता. काही होर्डिंग्जवर कारवाई झाली असली तरी अजूनही अनेक ठिकाणी नियम डावलून होर्डिंग्ज उभे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
त्यामुळे या कारवाईत सर्व बेकायदा होर्डिंग्ज हटवून होर्डिंग माफियांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
