पुण्यातील मुंढवा बॉटनिकल गार्डन प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. राज्य सरकारने ही जागा पुणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला असला, तरी जागेचा अधिकृत ताबा मिळण्यापूर्वीच सुमारे १,५०० झाडांच्या वृक्षतोडीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.
२६ मे रोजी शासनाचा आदेश जारी झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाने वृक्षतोडीसाठी नोटीस काढून नागरिकांच्या हरकती मागवल्या. यामध्ये चिंच, चंदन, बाभूळ यांसह अनेक प्रकारच्या झाडांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत प्रशासनाला एवढी घाई का, असा सवाल उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हरकती दाखल केल्या असून, या प्रकरणात प्रशासन पुढे काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंढवा बॉटनिकल गार्डनमध्ये १,५०० झाडांवर कुऱ्हाड? नागरिकांचा संताप
