.. शिर्डीतील प्रसिद्ध पेढ्यांबाबत एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे आता शिर्डीतील कथित भेसळयुक्त पेढा व्यवसाय रडारवर आला आहे.
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. दर्शनानंतर प्रसाद म्हणून पेढे खरेदी करणे ही अनेकांची परंपरा आहे. मात्र याच श्रद्धेचा गैरफायदा घेत काही व्यापारी भेसळयुक्त पेढ्यांची विक्री करत असल्याचे आरोप वर्षानुवर्षे होत आहेत.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नुकतीच शिर्डीतील अनेक पेढा विक्रेत्यांच्या दुकानांवर धडक तपासणी मोहीम राबवली. विविध पेढ्यांचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. काही ठिकाणी विक्रीस ठेवलेल्या पेढ्यांवर बुरशी आढळल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
स्थानिकांमध्ये हे पेढे ‘चिरंजीव पेढे’ किंवा ‘साखर पेढे’ म्हणून ओळखले जातात. कारण, विक्री न झालेला जुना माल पुन्हा प्रक्रिया करून नव्या पॅकिंगमध्ये बाजारात आणला जात असल्याचा आरोप आहे. तसेच अनेक पॅकेट्सवर उत्पादन तारीख किंवा एक्सपायरी डेट नसल्याचेही समोर आले आहे.
स्थानिक व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, दररोज लाखो रुपयांच्या या कथित भेसळयुक्त पेढ्यांची विक्री होते. शुद्ध खव्याचे पेढे महाग असताना, साखरेचे प्रमाण जास्त असलेले पेढे कमी दरात विकले जात असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही या कारवाईचे स्वागत केले आहे. नगरपालिकेकडून हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या स्वयंपाकगृहांची तपासणी सुरू असून, अस्वच्छता आणि भेसळ आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.आता प्रयोगशाळेचा अहवाल काय सांगतो आणि कथित भेसळखोरांवर कोणती कारवाई होते, याकडे राज्यभरातील साईभक्तांचे लक्ष लागले आहे.
तुकाराम मुंढेंचा धडाका! शिर्डीतील ‘चिरंजीव पेढे’ रडारवर, FDA ची मोठी कारवाई
