पुणे

बुकिंग करूनही गॅस मिळेना! भर उन्हात नागरिकांच्या रांगा, मुख्यमंत्र्यांचे दावे फेल?

राज्यात सध्या गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा जाणवत असून बुकिंग करूनही नागरिकांना गॅस मिळत नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून गॅस न मिळाल्यामुळे अनेक घरांमध्ये लहान मुलांवर उपासमरीची वेळ आली आहे. आज दुपारी भर उन्हात नागरिक गॅस घेण्यासाठी एजन्सीवर लांबच लांब रांगा लावून उभे होते, मात्र तरीही त्यांना गॅस दिला जात नाहीये. नागरिकांनी विचारणा केली असता एजन्सीकडून दरवेळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना परत पाठवले जात आहे.

दुसरीकडे, मुख्यमंत्री आणि सरकारकडून वारंवार असे सांगितले जात आहे की, नागरिकांना रोजच्या रोज लागणारा गॅस पुरवठा सुरळीत केला जाईल. मात्र, जमिनीवरची परिस्थिती पाहिली असता सरकारचे हे दावे खोटे ठरताना दिसत आहेत. काही महिलांनी संताप व्यक्त करत सांगितले की, आम्ही गेल्या १५ दिवसांपासून बुकिंग करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण बुकिंगच होत नव्हते. मोठ्या मुश्किलीने ८ दिवसांपूर्वी बुकिंग झाले असूनही अद्याप सिलिंडर मिळत नाहीये. स्थानिक समाजसेवकही सरकार आणि प्रशासनाकडे विचारणा करत आहेत, पण सर्वसामान्यांचे हाल थांबण्याचे नाव घेत नाहीत. गॅससारख्या जीवनावश्यक वस्तूसाठी जनतेला उन्हात तासनतास उभं राहावं लागत असल्याने प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.