पुणे

पुण्यावरील निर्बंधांचा तातडीने फेरविचार करावा व्यापारी, कष्टकरी, उद्योजक यांना राज्य सरकारने दिलासा द्यावा – माजी आमदार मोहन जोशी

पुणे – अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कोविड प्रतिबंधक निर्बंध तातडीने शिथिल करावेत अशी मागणी पुण्यातून एकमुखाने केली जात आहे, याची दखल घेऊन राज्य सरकारने निर्बंधांचा फेरविचार करावा अशी मागणी माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

कोरोना साथीचे प्रमाण पुण्यात खूपच नियंत्रणात आले असून शहरातील पॉझिटिव्ह रेट १.९७ टक्के इतका खाली आलेला आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यातही पुणेकरांचा पुढाकार आहे. आता पुण्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज निर्माण झालेली आहे. टाळेबंदी, त्यापाठोपाठ निर्बंध यामुळे व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ लागल्याने व्यावसायिक हवालदिल झालेले आहेत. व्यवसायातील उलाढाल घटल्याने, उद्योगधंदे मंदावल्याने अनेकांचे रोजगार कमी झाले आहेत, बुडाले आहेत. ही शहरातील वस्तूस्थिती आहे. सध्याच्या निर्बंधांनुसार चार वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्याची मुभा आहे. ही वेळ व्यापाराच्या दृष्टीने गैरसोयीची असून रात्री आठ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास मुभा मिळावी. दुकाने आणि हॉटेल व्यवसाय याला चालना मिळाली तर शहराची आर्थिक उलाढाल वाढेल. मध्यमवर्ग आणि कष्टकरी वर्गाचे उत्पन्न त्यामुळे वाढू शकेल आणि पुणेकरांना दिलासा मिळेल असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे. तसेच सध्या शनिवार, रविवार असे दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन आहे. तो फक्त रविवारपुरता ठेवावा. शनिवारी व्यवसायासाठी दुपारी चार वाजेपर्यंत परवानगी द्यावी, अशीही मागणी पत्रकात केलेली आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण जास्त असल्याचे कारण निर्बंध कायम ठेवताना सरकारने दिले आहे. शहर आणि ग्रामीण यांची एकत्र सांगड घालण्यापेक्षा यापुढे शहर आणि ग्रामीण अशी स्वतंत्र युनिट करुन निर्णय घ्यावेत, असे मोहन जोशी यांनी सुचविले आहे. मुख्य मंत्री उद्धव ठाकरे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात पुणेकरांच्या मागणीचा निश्चितच विचार करतील अशी अपेक्षा आहे.