पुणे

महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेच्या वतीने “स्वतःला वाचवा इतरांना वाचवा मोहीम” ; एक लाख प्रशिक्षित जीवरक्षक तयार करण्याचा मानस

पुणे (प्रतिनिधी)
सन २०१२ पासून भारतीय अस्थिरोग संघटना, प्रतिवर्षी ४ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावर अस्थि व सांधे आरोग्य दिन (Bone and Joint Day) साजरा करत असते. प्रतिवर्षी १ते ७ ऑगस्ट, संपूर्ण देशभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.
२०२१ यावर्षी साठी भारतीय अस्थिरोग संघटना स्वतःला वाचवा व इतरांनाही वाचवा (Save self Save one) ही थीम राबवणार आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतामध्ये रस्त्यांवरील अपघातात जाणाऱ्या बळींची संख्या रोखणे हा संघटनेचा मुख्य उद्देश आहे.
२०१८ च्या जागतिक आकडेवारी नुसार १९९ देशांपैकी रस्ते अपघात मधील बळींची आकडेवारीनुसार भारत देश प्रथम क्रमांकावर आहे. आपल्यानंतर चीन आणि अमेरिका यांची आकडेवारी आहे.
२०१९च्या आकडेवारीनुसार भारतातील संपूर्ण राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात एकूण ४,४९,००२ एवढ्या अपघातांची नोंद आहे. यापैकी १,५१,११३ लोकांना आपला जीव गमवावा लागला. ४,५१,३६१ लोकांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या.
१८ ते ४५ वर्ष वयोगटाच्या तरुण रुग्णांचे अपघात ग्रस्त होण्याचे प्रमाण ६९.३ टक्के आहे. १८ ते ६० या काम करणाऱ्या ग्रुप मधील लोकांचे अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण ८४.३ टक्के इतके जास्त आहे.
२०१९ मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या मध्ये ८६ टक्के पुरुष आहेत, जे बऱ्याच वेळा कुटुंबाचा एकमेव उत्पन्नाचा स्त्रोत असतात.
यातील बरेचसे मृत्यू अपघातानंतर तातडीची वैद्यकीय मदत, अपघातानंतर पहिल्या तासात ( गोल्डन आवर) मध्ये न मिळाल्यामुळे झालेले आहेत.
यातील बरेचसे मृत्यू अपघातानंतर योग्य प्रकारचे प्रथम उपचार दिल्यानंतर टाळता येऊ शकतात. परंतु,‌ सध्या, अशा प्रकारच्या जीवन रक्षक प्रथमोपचार व मदतीच्या प्रशिक्षणाचा खूपच अभाव दिसून येतो. अशा प्रथमोपचारांचे प्रशिक्षण आपण अनेक तरुण, विद्यार्थी, पोलीस यांना सहजरीत्या देऊ शकतो.
आम्ही महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेच्या वतीने,‌असे जीवन रक्षक व प्रथमोपचार प्रशिक्षण, महाराष्ट्रभरातील लाखो विद्यार्थी पोलीस व तरुणांना देण्याचे ठरवले आहे. एक लाख जीवन रक्षक तयार करण्याचा संघटनेचा मानस आहे.
१ ते ७ ऑगस्टदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे सदस्य असे प्रशिक्षण देणार आहेत. तसेच संपूर्ण देशभर देखील भारतीय अस्थिरोग संघटना असे प्रशिक्षण देणार आहे.
यासोबतच आपली हाडे आणि स्नायू बळकट ठेवण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजित शिंदे, सचिव डॉ. एन जे कर्णे,  हडपसर मेडिकल असोसिएशन सेक्रेटरी डॉ राहुल झांजुरणे यांनी दिली.