पुणे

पुण्यात ‘बिश्नोई गँग’च्या नावाने 2 कोटींची खंडणी; व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी!

पुण्यात पुन्हा एकदा ‘बिश्नोई गँग’च्या नावाने खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
उत्तमनगर परिसरातील एका नामांकित व्यावसायिकाला इंटरनेट कॉल करून तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.
फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला शुभम लोणकर असल्याचे सांगत व्यापाऱ्याच्या व्यवसायाची, गाडीची आणि रोजच्या हालचालींची संपूर्ण माहिती असल्याचा दावा केला. इतकंच नाही तर व्यापाऱ्याच्या कुटुंबीयांची नावं घेत थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.”स्वतःची काळजी घे” असा इशारा देत दोन कोटी रुपये तयार ठेवण्यास सांगितले.
या घटनेनंतर व्यापाऱ्याने तातडीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला असून कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.
गेल्या आठवड्यात वानवडी, वाडकी आणि आता उत्तमनगर अशा सलग तिसऱ्या घटनेमुळे पुण्यातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.